पावसाचा मोठा इशारा! पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता ; घाटमाथ्यावर यलो अलर्ट…

पुणे : राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, तर सखल भाग जलमय झाले. आता भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी सातारा, पुणे घाटमाथ्यासह काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यातील काही जिल्ह्यांत आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे असून, एक-दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
यंदा राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जुलैच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण सध्या ५८.६६ टक्के भरले असून धरणात २०.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. अतिवृष्टीमुळे वारणा नदीने धोक्याची पातळी गाठली होती. मात्र, पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नदीची पाणीपातळी घटू लागली असून पूरस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वडज धरणातून मीना नदीत १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मीना नदीला पूर आला असून नारायणगाव येथील मेहेर पूल, नेवकर पूल, केटी बंधारे आणि आठवडे बाजार परिसर पाण्याखाली गेला आहे. अनेक शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी यांच्या माध्यमातून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
हवामान विभागाने नागरिकांना नदी, नाले आणि धरण परिसरात जाणे टाळण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Editer sunil thorat



